कारंजा(Washim) :- चाकूचा धाक दाखवून १२ लाख रुपये किंमतीचे सोयाबीन व १७ लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल घेवून चालक पसार झाला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास मंगरूळपीर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा (Crime)दाखल केला आहे.
मंगरूळपीर रस्त्यावरची घटना
संकेत प्रकाश कुटे (२९, रा. वंजारवाडा, ता. जि. हिंगोली) यांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मंगरुळपीर रस्त्यावरील गायवळ फाट्यासमोरील जयभोले हॉटेलसमोर (hotel)चालक व त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदारांनी तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेला ट्रक क्र. एमएच ३८-डी१११९ व ट्रकमधील सोयाबीन किंमत ११ लाख ८८ हजार ८५२ रुपये व ट्रक किंमत १७ लाख रुपये असा एकूण २८ लाख ८८ हजार ८५२ रुपयाचा माल फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून व मारहाण करुन ट्रक मालासह घेवून पळून गेले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जावेद खान मुस्तफा खान पठाण (भोसी ता. औंढानाथ जि. हिंगोली) व आणखी दोन अनोळखी इसम यांच्यावर कलम ३०९(४), ३०९(६), ३५१(२) (३) ३,(५) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक(Inspector of Police) प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार करीत आहेत.