कारंजा(Washim):- यंदा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान राज्य परीक्षा मंडळाकडुन बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (Online Result) मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला.
कारंजा तालुक्याचा निकाल 92.53 टक्के
त्यानुसार कारंजा तालुक्याचा निकाल 92.53 टक्के लागला आहे. यंदा कारंजा तालुक्यातील विविध शाळातून 2422 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2412 विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य व विज्ञान(Arts, Commerce and Science) या तीन शाखातुन बारावीची परीक्षा दिली. त्यातील 2232 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने कांरजा तालुक्याचा निकाल 92.53 टक्के लागला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत कांरजा तालुक्यातील 306 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले, तर 943 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 733 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत आणि 250 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. तर या परीक्षेत 180 विद्यार्थ्यांना अपयशाचा (failure) सामना करावा लागला. मंगळवारी निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी व पालकांनी कॅफे सेंटर, तसेच सेतु केंद्रात जाऊन व मोबाईलवर (Mobile) आपला निकाल जाणून घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी कौतुक केले असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खचून न जाता पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
13 शाळांचा निकाल शंभर टक्के…
जाहीर झालेल्या निकालानुसार कामरगाव जि. प. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा, विद्याभारती ज्युनिअर काॅलेज कारंजाचा व्होकेशनलचा , मोहनलाल भंसाळी शाळा धनजचा व्होकेशनलचा, श्रीराम गुंजाटे व ब्ल्यु चिप काॅन्व्हेंट अँड ज्युनिअर काॅलेजचा विज्ञान विभागाचा, आप्पास्वामी विद्यालय वढवीचा विज्ञान विभागाचा, पं .पु. नारायण महाराज ज्ञानमंदिर अँड ज्युनिअर काॅलेजचा विज्ञान विभागाचा, शासकीय औद्योगिक काॅलेजचा तंत्रविज्ञान विभागाचा, जे.सी .जुनियर कॉलेजचा विज्ञान विभागाचा , वसंत विद्यालय पोहा कला विभागाचा , जे. डी. चवरे विद्यामंदिरचा विज्ञान विभागाचा ,साई निर्मल इंग्लिश पब्लिक स्कूलचा विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
उत्तीर्ण होण्यात मुलांपेक्षा मूलींचे प्रमाण अधिक
कांरजा तालुक्यात 1341 मुलांपैकी 1201 मुले तर 1081 मुलींपैकी 1031 मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यात. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 90.03 टक्के तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.64 टक्के एवढी आहे. यावरून यंदाच्या परीक्षेतदेखील नेहमीप्रमाणे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते