लाचखोरीमध्ये महसूल विभाग ठरला अव्वल
हिंगोली (Hingoli Crime) : प्रशासकीय विभागामध्ये अनेक नागरिकांनी दाखल केलेल्या प्रकरणात रकमेची मागणी केली जाते. त्यावरून काही जणांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत सन २०२४ या वर्षभरात ११ सापळे यशस्वी झाले. ज्यामध्ये १३ लाचखोरांवर पोलिसात (Hingoli Crime) गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रशासकीय विभागात भ्रष्टाचाराची लागलेल ही किड कधीही न संपणारी आहे. सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नसल्याची ओरड होत असते. त्या मागील कारण म्हणजे या कामासाठी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. काही जणांना नाईलाजास्तव पैसे देऊन कामे करून घ्यावी लागतात तर काही जणांची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली जाते.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात हिंगोली जिल्ह्यात लाचखोरीचे ११ गुन्हे दाखल (Hingoli Crime) झाले असून, त्यामध्ये १३ लाचखोरांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. लाचखोरीत महसूल विभाग अव्वल असून त्यांचे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. यासोबतच पोलीस दलातील दोन, महावितरण एक, कळमनुरी पंचायत समिती एक, जीएसटी कार्यालय आणि एका सरपंच पतीवर सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.
या वर्षामध्ये सर्वाधिक रकमेचा छापा म्हणजे बळसोंड ग्रामपंचायतमधील लाचखोर तलाठी विजय सोमटकर यांनी ५० हजाराच्या लाचेची मागणी करून ती खासगी व्यक्ती जयंत देशमुख यांच्या मार्फत स्विकारली होती. तसेच जीएसटी कार्यालयातील अधिक्षक वर्ग २ मनोज मगरे यांनाही १० हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने पकडले होते. अनेक शासकीय कार्यालयात विविध कामांसाठी लाचेची मागणी केली जाते. कोणत्याही कार्यालयात लाचेची मागणी केल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक विकास घटवट यांनी केले आहे.
जीएसटी कार्यालयात पहिलाच छापा
कर चुकवेगिरी करणार्या व्यक्तीवर करडी नजर ठेवणार्या जीएसटी कार्यालयातच मध्यंतरी (Hingoli Crime) लाचखोरीचा प्रकार उघड झाला. वसमत तालुक्यातील एका नोंदणीकृत कंपनीला जीएसटी रिटर्न दाखल न केल्यामुळे १० हजाराच्या लाचेची मागणी करून स्विकारणार्या अधिक्षक वर्ग-२ चे मनोज मधुकर मगरे यांना एसीबीने रंगेहात पकडले होते.
पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांनी तीन महिन्यात यशस्वी केले सहा छापे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट हे २७ सप्टेंबर २०२४ रोजी रूजू झाले. त्यांनी तीन महिन्यात सहा सापळे यशस्वी केले. ज्यामध्ये दोन तलाठी, एक शिक्षण विभाग लिपिक, एक वसमत ग्रामीण ठाण्याचा हवालदार व एक जीएसटी कार्यालयातील अधिक्षक असे एकूण सहा गुन्हे दाखल केले आहेत. आणखी काही लाचखोर त्यांच्या रडारवर आहेत.