नागपूर (Nagpur):- सायबर गुन्हेगाराने एम्सच्या एका महिला डॉक्टरला (Doctor) चक्क १३ लाखाचा गंडा घातला. बँकेच्या कस्टमर केअरचा (Customer care) नंबर शोधण्यासाठी मोबाईलमध्ये सर्च केला. मिळालेल्या नंबरवर त्यांनी कॉल केला. पुढच्या व्यक्तीने एक लिंक पाठविली. त्यावर क्लिक करताच त्यांचे बँक खाते पार रिकामे झाले.
कस्टमर केअरच्या शोधात लिंकवर केले ‘क्लिक’
सायबर गुन्हेगाराने (Cyber crime) त्यांच्या खात्यातील एक दोन नव्हे तर तब्बल १३ लाख ७५ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक (Fraud)केली.याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिमा (काल्पनिक नाव) (वय ३७) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. त्या एम्स रुग्णालयात सहायक प्राध्यापक आहेत. मिहान परिसरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत त्यांचे खाते आहे. खात्यात रक्कमही होती. त्यापैकी त्यांना आठ लाखांची एफडी करायची होती. बँकेत गेल्या आणि आठ लाखांची एफडी केली.
मात्र, तेवढी रक्कम खात्यातून डेबिट झाली नाही. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली.संबंधिताशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांना देण्यात दिला. त्यामुळे घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी मोबाईलवर सर्च केले. मिळालेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. अन घात झाला.
बोला मॅडम काही सेवा अन् साधला डाव
रिमा यांनी फोन करताच समोरुन एका व्यक्तीने ‘बोला मॅडम काही सेवा’ असे म्हणून तुमचे काम लगेच करून देतो, अशी बतावणी केली. आणि काही सेकंदात त्याने रिमा यांना एक लिंक पाठविली. त्यात एपीके फाईल होती. लिंक डाऊन लोड केल्यावर त्यांना मोबाईलमध्ये काही गडबड झाल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर एका मागून एक अशा अनेक ओटीपीचे मॅसेज आले. सर्व मॅसेज बघून त्या घाबरल्या. बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातील १३ लाख ७५ हजारांची रक्कम डेबिट झाली होती. एवढेच काय तर सायबर गुन्हेगाराने त्यांच्या जुन्या एफडीवर २ लाख ८४ हजार ८१० रुपयांचे कर्जदेखील (Loan)घेतले.
सदर घडलेल्या प्रकारामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. लगेच त्यांनी बेलतरोडी पोलिस ठाणे गाठले. येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी घटनेचे गांभीर्य पाहता वेळीच गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.