परभणी/पाथरी(Parbhani):- रब्बी हंगामातील पिकांसाठी असणार्या पोषक परिस्थितीमुळे पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्राच्या अधिक म्हणजे १३९ टक्के क्षेत्रावर पेरणी केली असल्याचा अहवाल तालुका कृषी विभागाने सोमवारी जाहीर केला आहे.
गळीत धान्याचा पेरणी टक्का घसरली तर कडधान्य क्षेत्र दुप्पटीने वाढले
परभणीतील पाथरी तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी(heavy rain) नंतर शेती उत्पादनात मोठी घट आलेली असताना रब्बी हंगामांकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत .अतिरिक्त झालेले पर्जन्यमान , उच्च पातळी बंधाऱ्यांमधील पाणी व जायकवाडी धरणात असलेला पाणीसाठा या पोषक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी केल्याचे चित्र तालुका कृषी विभागाकडून जाहीर झालेल्या अंतिम पेरणी अहवालातून स्पष्ट झाले आहे .सोमवार ६ जानेवारी रोजी आलेल्या रब्बी हंगाम सन २४ – २५ पीकनिहाय व मंडळ निहाय अंतिम पेरणी अहवालानुसार पाथरी तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कृषी विभागाला अपेक्षित असणाऱ्या २४ हजार ९५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे ३३ हजार ६१२ हेक्टर ( १३९ .४९ टक्के ) यंदा रब्बी लागवड व पेरण्या केल्या आहेत.
तालुक्यात १४ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी
यामध्ये ज्वारी ९ हजार ६६३ हेक्टर , गहू ५ हजार ३८ हेक्टर तर मका १०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे .कडधान्याची ९ हजार ९९७ हेक्टरवर पेरणी झाली असून यामध्ये सर्वाधिक ९ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे .गळीत धान्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या २३ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली असून ६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे .करडई पिकाची सर्वाधिक ५७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे .
स्थानिक जलस्रोतांना असलेले मुबलक पाणी व बंधारे , जायकवाडी कॅनलला येणारे पाणी यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे यंदा कल दाखवला असून यंदा तालुक्यात उसाचे ८ हजार ७२७ हेक्टर क्षेत्र आहे .यामध्ये ७ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली असून ७८० हेक्टर खोडवा ऊस जोपासला आहे .




