परभणी(Parbhani) :- जिल्ह्यात वीज चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. घरगुती, औद्योगिक व कृषी पंप वीज ग्राहकांकडून वीज चोरी होत आहे. महावितरण कंपनीकडून (Maha distribution company) वीज चोरांविरुध्द धडक मोहिम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत १९५ वीज ग्राहकांकडून ७५ लाखाची वीज चोरी केल्याचे समोर आले आहे.
महावितरणची धडक मोहिम वीज चोरांवर कारवाई
परभणी जिल्ह्यात जवळपास ३ लाख वीज ग्राहक आहेत. दरमहा वीज वापरानुसार ग्राहकांना वीज देयक देण्यात येते. मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे देयकाची थकबाकी वाढली आहे. विजेचा वापर आणि वसूल होणारी थकबाकी यामध्ये मोठी तफावत आहे. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई(action) करण्यात येते. मागील नऊ महिन्याच्या कालावधीत वीज चोरांविरुध्द धडक मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १९५ ग्राहकांनी ७५ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. १० वीज चोरांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४ हजार २०१ वीज मिटरची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये २ हजार १८६ मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली आहे.
वीज चोरी करणार्या वीज ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एकूण ८७ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे. यापुढे ही विजेची चोरी करणार्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.