Washim :- कळपापासून भटकलेल्या २ टस्कर हत्तींचा उपद्रव सुरूच असून काल २६ जून रोजी दोन टस्कर हत्तींनी आरमोरी तालुक्यातील वडधा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) गोदामावर धडक दिली. गोदामाचे शटर तोडून आतमधील धानाची नासाडी केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास निदर्शनास आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
वडधा येथील कृऊबासच्या गोदामाचा शटर तोडुन केली धानाची नासाडी
प्राप्त माहितीनुसार सदर दोन टस्कर हत्ती हे काल २६ जूनला रात्री ११ वाजता च्या सुमारास सुरुवातीला नरोटीमाल जंगल परिसरातून डार्ली या गावात आले . डार्ली गावात घुसून संतोष लाकडे यांच्या गोडाऊनचा शटर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर टस्कर हत्तींना यामध्ये यश आले नाही . नागरीकांना याची भणक लागताच त्यांनी हत्तींना पिटाळून लावले.त्यानंतर परत सदर हत्तींनी शेतातून वडधा गावाकडे आगेकूच केली. यानंतर गावाबाहेर असलेल्या मार्केटिंग फेडरेशनचे खरेदी केंद्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये येऊन गोडाऊनच्या शटरची तोडफोड करून आतमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमध्ये अनेक धानाच्या पोत्याची नासधूस केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती मार्केटिंग फेडरेशनला होताच जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे, आरमोरी खरेदी -विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष मनोज मने, उपसभापती दीपक निंबेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार , सचिव अनिश निमजे , व्यवस्थापक अक्षय माकडे , केंद्रप्रमुख कार्तिक खेडकर, ठवकर आदी कर्मचार्यांनी गोडाऊनची पाहणी केली व पंचनामा केला.




