परभणीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांचा पुढाकाराने
परभणी/गंगाखेड (Gangakhed Upazila Hospital) : उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत मुंडे यांच्या पुढाकाराने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात मागील सहा महिन्यात कुटुंब कल्याण, पुरुष नस बंदीसह सिझर आदी सारख्या एकूण २५२ शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे गोर गरीब सर्व सामान्य कुटुंबांना याचा मोठा फायदा झाला आहे.
५९ सिझेरियन शस्त्रक्रियांचा समावेश
गंगाखेड शहरात उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या आरोग्य विभागाने आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सोयी सुविधांचा सर्व सामान्य गोर गरीब कुटुंबांना फायदा व्हावा या हेतूने आरोग्य विभागाने एखाद्या खाजगी रुग्णालयात नसेल असे आधुनिक शस्त्रक्रिया गृह उपजिल्हा रुग्णालयात उभारून दिल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ हेमंत मुंडे यांनी जातीने लक्ष देत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा टाके, डॉ. कल्पना घुगे, डॉ. गणेश वडजे यांच्यासह खाजगी रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. सायली मुरकुटे (होळंबे), डॉ. दिलीप नागरगोजे, भुल तज्ञ डॉ. अमित उगीले, बाल रोग तज्ञ डॉ. अमोल चांडक यांच्या सहकार्याने दि. १ एप्रिल २०२४ पासून ते दि. ३१ ऑक्टोबर दरम्यान सहा महिन्याच्या कालावधीत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात कुटुंब नियोजनाच्या १६३, पुरुष नस बंदीच्या २, गर्भ पिशवी काढणे १०, गर्भ पिशवीला टाके देणे १, गर्भवती महिलांच्या प्रसूतीत अडथळा निर्माण झाल्याने ५९ गर्भवती महिलांचे सिझर करून यातील १७ महिलांवर सिझर दरम्यानच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आदी सारख्या खाजगी रुग्णालयात अत्यंत महागड्या असलेल्या सुमारे २५२ शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयात मोफत करून दिल्याने सर्व सामान्य गोर गरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा झाला आहे.
गोर गरीब कुटुंबातील रुग्णांना मिळाला मोठा आधार
या बरोबरच सहा महिन्याच्या कालावधीत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती गृहात २०८ पेक्षा अधिक गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवेबरोबर सकाळचा चहा, नाष्टा तसेच दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी उपलब्ध करून दिल्याने उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे. याकामी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहायक अधिसेविका श्रीमती राधा बेले, इन्चार्ज सिस्टर श्रीमती अंजली पुरी, श्रीमती गंगा होळकर, शस्त्रक्रिया गृह परिचारिका श्रीमती उषा कलटले, पुरुष अधिपरीचारक राजेंद्र गायकवाड, श्रीमती वैशाली श्रीमंगले, आरोग्य कर्मचारी नागेश चव्हाण, भिमा राठोड, प्रशांत राठोड आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
आधुनिक असे शस्त्रक्रिया गृह
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आधुनिक असे शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले असून येथे मिळणाऱ्या सोयी सुविधामुळे रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
खाटांची संख्या वाढविण्याची गरज
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयास पन्नास खाटांची मंजुरी असून नांदेड पुणे राष्ट्रीय महामार्गावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांत अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. त्याच प्रमाणे पालम, सोनपेठ या तालुक्यांसाठी हे जवळचे मोठे रुग्णालय असल्याने दैंनदिन उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील खातांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे चित्र रुग्णालयात निर्माण होणाऱ्या स्थितीवरून दिसत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा लाभ घ्यावा
वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांचे आवाहन
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात परिसरातील नागरिकांसाठी शासनाकडून आरोग्य विषयक वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. रात्री अपरात्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी नेमून दिला असून छातीच्या त्रासामुळे त्रस्त रुग्णांची इसीजी काढून त्यांच्यावर योग्य उपचार करून अस्वस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून करून दिल्या जात आहे. शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य विषयक सोयी सुविधांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी केले आहे.