सलग दोन दिवसात ६ लाख ८० हजाराची रोकड पकडली
हिंगोली (Wasmat Crime) : वसमत शहरातील कारंजा चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन तपासणी केली जात असताना एका दुचाकीवरून ४ लाख ८० हजार रूपयाची रोकड सोमवारी जप्त करण्यात आली.
वसमत शहरातील मदिना चौकात एका वाहनातून पैसे आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने १० नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने २ लाख जप्त केले असून त्याची चौकशी अद्यापही सुरूच आहे. ११ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत कारंजा चौक भागात वाहनांची तपासणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार नितीन गोरे, आजम प्यारेवाले, आकाश टापरे, हरीभाऊ गुंजकर यांचे पथक करीत होते.
एका मोटार सायकलच्या डिकीमध्ये तपासणी दरम्यान वसमत शहरातील पाटीलनगर भागातील नारायण गंगाराम मोरे यांच्याकडे ४ लाख ८० हजार रूपये दिसून आली. पोलिसांनी संबंधिताकडे रकमेबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी आदिनाथ पांचाळ यांच्याकडे जमा करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या रकमेबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वसमत शहरात सलग दोन दिवसात ६ लाख ८० हजार रूपयाची रोकड ताब्यात घेतली आहे.