गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून १२ व्या स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन
गडचिरोली (Project Udan ) : योग्य मार्गदर्शनाच्या अभावामूळे दुर्गम भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडू नये याकरीता गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आगामी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक १७ जानेवारी रोजी विविध ठिकाणी आयोजित सराव परीक्षेत ४३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे,उपपोस्टे,पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७४ वाचनालयांमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. १२ चे आयोजन करण्यात आले.
दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील १२, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील १५, व पोस्टे वांगेतुरी हद्दीतील १५ विद्यार्थ्यांनी ही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. तसेच ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय, गर्देवाडा येथे घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत ०८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या सराव पेपरमध्ये २५५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे,उपपोस्टे,पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी यांनी सहकार्य केले.




