कारंजा(Washim):- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 45 वर्षीय शेतकरी पुत्राने तननाशक प्राशन करून आत्महत्या (suicide) केली. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बांबर्डा येथे 22 मे रोजी दुपारी घडली. संजय सिताराम ढेकळे वय 45 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव असून, ते बांबर्डा येथे वास्तव्यास होते.
आईच्या नावे असलेल्या शेतीवरील कर्ज फेडण्याची चिंता
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आईच्या नावाने जामठी शेतशिवारात शेती असून, त्या शेतीची वहीती ते स्वतः करीत होते. अशातच गेल्या तीन वर्षापासूनची सततची नापिकी, आर्थिक विवंचना (Financial hardship) ,आईच्या नावे असलेल्या शेतीवरील कर्ज फेडण्याची चिंता आणि विवाहयोग्य मुलीच्या लग्नाची चिंता यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी तणनाशक प्राशन केले. कुटुंबीयांच्या हि बाब लक्षात येताच, त्यांनी उपचाराकरिता त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात(Rural hospitals) दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती(Amravati) येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यानुसार अमरावती येथील इरविन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुपारी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युपश्चात त्यांच्या मागे आई, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार असून, गुरुवारी 23 मे रोजी दुपारी 1 वाजता बांबर्डा येथे शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार(Funeral) करण्यात आले. दरम्यान, अमरावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करतील.