परभणी/गंगाखेड(Parbhani) :- तालुक्यातील धारासूर व मैराळसावंगी शिवारातील खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूने पंपाच्या सहाय्याने रात्री अपरात्री विनापरवाना अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे वृत्त गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी दैनिक देशोन्नतीने (Deshonnati)प्रकाशित करताच याची दखल घेत तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे यांच्यासह पो. नि. बोलमवाड यांच्या पथकाने मैराळसावंगी येथील अवैध वाळू उपस्यावर संयुक्त कारवाई करून ५ ब्रास वाळू साठा जप्त करून पाईप केला जाळून नष्ट केला आहे.
तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्यासह पो. नि. बोलमवाड यांच्या पथकाची संयुक्त कारवाई
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी (Godavari river)पात्रातून गोदाकाठच्या गावातील वाळू माफिया कडून केल्या जात असलेल्या विनापरवाना अवैध वाळू उपस्याला लगाम लावण्यासाठी गंगाखेड येथील तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे यांनी विशेष मोहीम राबवित तालुक्यातील मसला, झोला, पिंप्री, गंगाखेड शहर परिसर व धारखेड शिवार आदी ठिकाणी कारवाई करून वाळू उपस्यासाठी असलेले तराफे नष्ट करून शेकडो ब्रास वाळूचे अवैध साठे जप्त केले असे असतांना सुद्धा तालुक्यातील धारासूर – मैराळसावंगी शिवारातील खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूने नदी पात्रातील पाण्यात पाईप सोडून सक्शण पंपाच्या सहाय्याने वाळू उपसा करून या वाळूची चढ्या दरात विक्री केल्या जात असल्याचे वृत्त दैनिक देशोन्नतीने गुरुवार रोजी प्रकाशित केले.
तीनशे फूट पेक्षा अधिक लांबीचा पाईप फुटबॉलसह जप्त करून जागीच जाळून नष्ट
या वृताची दखल घेत तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे यांच्यासह सोनपेठ पोलीस ठाण्याचे पो. नि. सूर्यमोहन बोलमवाड, नायब तहसीलदार अशोक केंद्रे, नायब तहसीलदार सुनिल कांबळे, मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी संतोष इप्पर, महसूल सहाय्यक सुनिल चाफळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद कुलकर्णी, जमादार मनोज राठोड, संजय रासवे, पो. शि. शिवाजी शिंदे, होमगार्ड धाकपाडे, धारासूर येथील पोलीस पाटील रनबावरे, मैराळसावंगी येथील पोलीस पाटील जाधव आदींच्या संयुक्त पथकाने गुरुवार रोजी सकाळी मैराळसावंगी येथे गोदावरी नदी पात्राला भेट देऊन नदी काठावर उपसा केलेल्या ५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त करून धारासूर येथील पोलीस पाटील रनबावरे यांच्या ताब्यात देत वाळू काढण्यासाठी नदी पात्रातील पाण्यात सोडलेला चार इंची अंदाजे तीनशे फूट पेक्षा अधिक लांबीचा पाईप फुटबॉलसह जप्त करून जागीच जाळून नष्ट केला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दनाणाले असुन गोदावरी नदी काठावरील तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी, चिंचटाकळी आदी ठिकाणाला ही महसूल प्रशासनाने भेट देऊन अवैध वाळू उपसा थांबावावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे.