हिंगोली(Hingoli):- हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका शिवारातील एका झोपडीतून गुन्हे (Crime)शाखेच्या पथकाने २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे देशी दारूचे ५० बॉक्स जप्त केले आहे. या प्रकरणी एका व्यक्ती विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी पहाटे गुुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या मद्य, रोख रक्कम, भेटवस्तुची वाहतुक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. दरम्यान, हिंगोली ते वाशीम जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या कनेरगावनाका शिवारात एका झोपडीमध्ये देशीदारुचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, जमादार आझम प्यारेवाले, नितीन गोरे, हरीभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शोध मोहिम हाती घेतली होती.
कनेरगावनाका शिवारातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सर्व झोपड्यांची पोलिसांनी तपासणी सुरु केली होती. तब्बल दोन तासाच्या तपासणी नंतर एका झोपडीमध्ये देशीदारुचे बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी झोपडीत केलेल्या पाहणीमध्ये देशीदारुचे ५० बॉक्स आढळून आले असून त्याची किंमत २ लाख ४०हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी जमादार कंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद गावंडे याच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, सहाय्यक पोेलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, अंभोरे पुढील तपास करीत आहेत.