महसुल प्रशासनाकडून अहवाल सादर
परभणी/पाथरी (Heavy rains affected farmers) : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्याच्या वर झालेल्या पीक नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनाने तयार केला असून यामध्ये तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये ४१हजार ५२१ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवत बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी ५८ कोटी ३ लाख ३४ हजार २०० रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र सर्वाधिक दाखवण्यात आले आहे.
अहवालानुसार जिरायती क्षेत्र सर्वाधिक बाधीत
पाथरी तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते . यावेळी शासनाकडून नुकसान भरपाई साठी नुकसानीचे पंचनामाचे आदेश देण्यात आले होते .त्यानुसार नियुक्त पथकाने पंचनामे केले होते . अतिवृष्टीमुळे ३३ टक्के च्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची माहिती शासनास विवरणपत्रा मधून मंडळनिहाय सादर करण्यात आली असून यामध्ये तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये शेती पिकाचे ५६ गावातील बाधित क्षेत्र ४१ हजार ५२१ हेक्टर दाखवण्यात आले आहे . यात केवळ ७ गावात बागायती बाधीत झाल्याचा अहवालात नमुद करत ६७६ हेक्टर इतके कमी क्षेत्र दाखवण्यात आले आहे.
बागायती ६७३ हे .तर फळबाग २९६ हे बाधीत
अहवालानुसार ३२ गावातील फळबागांचे २९६ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे .झालेल्या शेतीपीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी तालुका महसूल प्रशासनाने जिरायतीसाठी सर्वाधिक ५५ कोटी १५ लाख ७ हजार २०० रूपये , बागायतीसाठी १ कोटी ८१ लाख ७१ हजार तर फळबाग बाधीत क्षेत्रासाठी १ कोटी ६५ लाख ६ हजार रुपये अपेक्षीत निधीची मागणी करण्यात आली आहे.
७ गावातील शेतशिवारात बागायती नुकसान?
बागायती क्षेत्रामध्ये भाजीपाला ६९ हेक्टर , ऊस ५७७ हेक्टर तर इतर बागायती पिके २७ हेक्टर बाधीत झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
फळबाग बाधित क्षेत्रामध्ये द्राक्ष ४ हेक्टर ,पपई ४१ हेक्टर , संत्री २७ हेक्टर , चिकू ७ हेक्टर ,मोसंबी २५ हेक्टर , केळी १२२ हेक्टर इतर फळबाग ७० हेक्टर समावेश आहे,
पाथरी महसूल मंडळामध्ये १० हजार ७४१ हेक्टर ,हादगाव महसूल मंडळात ८ हजार ६ ९० हेक्टर ,बाभळगाव महसूल मंडळात १३ हजार ७२ हेक्टर तर कासापुरी महसूल मंडळात ९ हजार ४४ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित असल्याचे म्हटले आहे.
पाथरी महसूल मंडळ तीन गावांमध्ये ३३१ हेक्टर , हादगाव महसुल मंडळातील एका गावात १२२ हेक्टर , बाभळगाव महसुल मंडळातील २ गावात १९५ हेक्टर तर कासापुरी महसुल मंडळातील १ गावात २५ हेक्टर क्षेत्रावर बागायती पिके बाधित झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आल्याने इतर ४९ गावातील बागायती क्षेत्र का घेतले नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.