हिंगोली(Hingoli):- शहरातील अनुराधा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड हिंगोली शाखेत ४०३८ ठेवीदारांच्या ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयाच्या रकमेचा अपहार केल्याने संस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळ, कर्मचारी अशा ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील मुख्य आरोपी अध्यक्ष अशोक कांबळे याला अटक (arrested) केल्यानंतर त्याच्या मालमत्तेचा शोध पोलिसांनी सुरू केला. आहे.
पतसंस्थेच्या अध्यक्षाला सात दिवसाची पोलीस कोठडी
अनुराधा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड हिंगोली शाखेत ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयाच्या रकमेचा अपहार झाल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन.बी.काशिकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी अध्यक्ष अशोक कांबळे हा फरार होता. पोलिसांनी २६ जुलैला अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अध्यक्षाने अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी करून गुंतवणूक केल्याचा आरोप पतसंस्थेच्या ग्राहकासह पिग्मी एजंटांनी केला असून अध्यक्षाच्या नातेवाईकांच्या नावावर देखील गुंतवणूक केल्या संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणची गुंतवणूक केलेली मालमत्ता विक्री केल्याचे निवेदनात नमूद केल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठे कुठे मालमत्ता खरेदी केली याचा शोध सुरू केला आहे. विशेष करून अध्यक्षाचा मूळ जिल्हा असलेल्या वाशिम जिल्ह्यात मालमत्तेचा शोध घेण्याकरीता पोलिस उपनिरीक्षक रामराव पोटे, सपोउपनि विलास सोनवणे यांच्यासह कर्मचार्यांचे पथक तैनात केले आहे. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक(Inspector of Police) एन.बी.काशिकर हे तपास करीत आहेत.