परभणी (Parbhani):- जिल्हा पोलीस दलात विविध कारणांनी संलग्न असलेल्या पोलीस अंमलदारांना मुळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे. ६७ अंमलदारांना त्यांच्या मुळठिकाणी पाठविण्यात आले आहे. या बाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी मंगळवार ६ ऑगस्ट रोजी आदेश काढले आहेत.
एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांना या निर्णयामुळे चाप बसला
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संलग्न न करण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पत्र काढत सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या होत्या. संलग्नच्या नावाखाली वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांना या निर्णयामुळे चाप बसला. परभणी जिल्हा पोलीस आस्थापनेवरही पोलीस अंमलदार वेगवेगळे कारण, अडचण, प्रशासकीय बाब यामुळे इतर ठिकाणी संलग्न (Attached) होते. सदर सर्व अंमलदारांना त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आदेश काढले आहेत. पोलीस हवालदार, पोलीस नाईक, चालक, पोलीस शिपाई, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदी संवर्गातील एकूण ६७ पोलीस अंमलदारांना त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे. सदर कर्मचार्यांना कार्यमुक्त करुन त्यांचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.