परभणी (Parbhani) :- पावसाळा सुरू होऊन आता दोन महिन्यापेक्षाही अधिकचा कालावधी उलटला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सस्मया अजुनही सुटलेली दिसत नाही. जिल्ह्यातील एकूण ६ हजार ७६२ हातपंपा पैकी सुमारे ७३९ हातपंप भर पावसाळ्यात पाण्याअभावी बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात भटकंती होत आहे.
६ हजार ७६२ हातपंपा पैकी सुमारे ७३९ हातपंप भर पावसाळ्यात पाण्याअभावी बंद
जिल्हाभरात एकूण जिल्हा परिषद अंतर्गत ६ हजार ७६२ हातपंप असून त्यामध्ये परभणी तालुक्यात १ हजार २१, पूर्णा तालुक्यात ७६९, गंगाखेड तालुक्यात ८५५, पालम तालुक्यात ६८४, सोनपेठ तालुक्यात ५४७, पाथरी तालुक्यात ५८८, मानवत तालुक्यात ३५८, सेलू तालुक्यात ६९८ आणि जिंतूर तालुक्यात १ हजार २४२ एवढे हातपंप आहेत. त्यापैकी एकूण ८६ हातपंप जुलै अखेर दुरुस्त करण्यात आले. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे परभणी तालुक्यातील १०५, पूर्णा तालुक्यातील ७३, गंगाखेड तालुक्यातील १०८, पालम तालुक्यातील सर्वाधिक १२७, सोनपेठ तालुक्यातील ७६, पाथरी तालुक्यातील ५५, मानवत तालुक्यातील २०, सेलू तालुक्यातील ७१ आणि जिंतूर तालुक्यातील १०४ असे मिळून एकूण ७३९ हातपंप बंद पडले आहेत. तर ३१ जुलै अखेर परभणी तालुक्यातील ९१६, पूर्णा तालुक्यात ६९३, गंगाखेड तालुक्यात ७४५, पालम तालुक्यात ५५६, सोनपेठ तालुक्यात ४७१, पाथरी तालुक्यात ५३३, मानवत तालुक्यात ३३८, सेलू तालुक्यात ६२३ आणि जिंतूर तालुक्यात १ हजार १३६ असे मिळून एकूण ६ हजार ११ हातपंप सद्यस्थितीत सुरू आहेत.
पाणी पातळी खोल जावून बंद पडण्याचे प्रमाण पाहता जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी पावसाळ्यात देखील वाढली
भर पावसाळ्यात हातपंप नादुरुस्तीचे, बंद पडण्याचे आणि पाणी कमी होऊन अथवा पाणी पातळी खोल जावून बंद पडण्याचे प्रमाण पाहता जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी पावसाळ्यात देखील वाढली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हाभरात अपेक्षित पाऊसमान न झाल्यास बंद पडणार्या हातपंपांची संख्या अधिक होण्याचा धोका संभवतो. यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या घरावर अथवा जेथे शक्य असेल तेथे पाणी जिरविण्याची पध्दत (Rain water harvesting) अनुसरल्यास जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पर्यायाने जवळचा हातपंप, विहिर आणि अन्य जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
३१ जुलै अखेरची जिल्ह्यातील परिस्थिती ; एकूण ६ हजार ७६२ हातपंप
चालू हातपंपाची माहिती पहा जि.प. संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उप विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व हातपंप दुरुस्तीचे काम केले जाते. सद्यस्थितीत सुरू असलेल्या, बंद पडलेल्या आणि अंशत: पडलेल्या तसेच पाणी खोल गेल्याने बंद पडलेल्या हातपंपांची माहिती जि.प.च्या संकेतस्थळावर अपलोड केली जाते.