औसा (Latur):- सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये हमीभाव द्यावा आणि गतवर्षीचा खरिपाचा पीकविमा द्यावा, या मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या विजयकुमार घाडगे यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महिला व पुरुष शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.26) औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विजयकुमार घाडगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणास नऊ दिवस झालेत, हे उपोषण उठावे म्हणून सर्व लोक देवाला प्रार्थना, आरत्या घालून साकडे घालत आहेत. विविध संघटना, पक्ष बाजूला ठेऊन मी शेतकरी (Farmer)या नात्याने वेगवेगळे आंदोलन, मोर्चे, धरणे, ट्रॅक्टर रॅली काढून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यात शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्याने विविध स्वरूपाचे आंदोलन करुन सरकार सोबत चर्चा करताहेत. परंतु कुठलाच निर्णय होत नाही. घाडगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत जाऊन अत्यंत गंभीर बनली आहे. त्यामुळे आम्ही आज प्रशासनासोबत चर्चा केली परंतु कसलाही वरिष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार झालेला नाही, त्यामुळे उद्यापर्यंत निर्णय घ्या; अन्यथा औसा येथे 28 सप्टेंबर रोजी महिला पुरुष शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील, असा इशारा राजेंद्रआबा मोरे, शीतल तमलवार, दत्ता किणीकर आणि राजीव कसबे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे.