औसा (Latur):- सोयाबीनला ८५०० रुपये हमीभाव द्यावा आणि गतवर्षीचा खरिपाचा पीकविमा द्यावा. या मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या विजयकुमार घाडगे यांच्या आंदोलनाला राज्याचे क्रीडा मंत्री(Minister of Sports) संजय बनसोडे यांनी भेट देऊन उपोषण मागे घ्यावे, आपण सरकार दरबारी या प्रश्न बैठक लावू, असे आश्वासन दिल्यानंतरही ते धुडकावून लावत ‘ठोस काय ते सांगा!’ असे म्हणत विजयकुमार घाडगे यांनी आपले उपोषण चालू ठेवले. सोमवारपर्यंत सरकारने या प्रश्नी निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटही त्यांनी सरकारला दिला. क्रीडामंत्र्यांनी उपचार घेण्याचे केलेले आवाहनही त्यांनी फेटाळून लावले.
उपोषणाचा आजचा ११ वा दिवस
मार्केटमध्ये सध्या सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनला किमान ८५०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी अ.भा. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा ११ वा दिवस आहे. दरम्यान या उपोषणाला शनिवारी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी भेट देत घाडगे यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले. सोयाबीन हमीभाव प्रश्न आपण शासनाकडे बैठक लावून तोडगा काढू, असे आश्वासन बनसोडे यांनी दिले. मात्र या प्रश्नी निर्णय हवा, असे म्हणत घाडगे यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. उपचार घेण्याबाबत केलेले आवाहनही घाडगे यांनी फेटाळून लावले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादीचे(nationalist) जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.