परभणी (Parbhani):- शासनाच्या विविध योजनांची सर्व सामान्य नागरीकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत परभणी जिल्ह्यात ९७२ योजना दुतांची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी शासकीय संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक तर शहरी भागात ५ हजार लोकसंख्येमागे १ अशा योजना दुतांची निवड करण्यात येणार आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजना दुतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. योजना दूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांबाबत नागरीकांना माहिती देतील. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावे तसेच त्याच्याकडे स्मार्ट फोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज (Online application)व इतर आवश्यक कागदपत्रे नियुक्तीवेळी सादर करावी लागतील, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.