परभणी/दैठणा(Parbhani) :- रस्त्यावर उभ्या ऊसाच्या ट्रॉलीला धडकुन एका दुचाकी स्वाराचा मृत्यू (Death)झाल्याची घटना गुरुवार २६ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील वडगाव येथे घडली. या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात अपघाताची (Accident)नोंद करण्यात आली आहे.
ट्रॉलीला धडकुन दुचाकी स्वाराचा मृत्यू
संग्राम सुदामराव साबळे (वय २७ वर्ष, रा. भोगाव ) असे मृत युवकाचे नाव आहे. सध्या सर्वत्र ऊसाने भरलेली वाहने रस्त्याने धावत आहेत. बहूतांश ऊस वाहनावर रिफ्लेक्टर लावलेली नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. शिवाय रस्त्यावर जूनी वाहने, ऊसाच्या ट्रॉली उभी असतात. रात्रीच्यावेळी ही वाहने दिसत नसल्याने देखील अपघात होत आहेत. गुरुवार २६ डिसेंबरच्या रात्री पोखर्णी – पाथरी या रस्त्यावर वडगाव येथे अपघात झाला. संग्राम सुदामराव साबळे हा युवक पोखर्णीहून पाथरीकडे दुचाकीने जात होता. वडगाव जवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर उभी होती. या ट्रॉलीला रेडियम ही नव्हते. रात्री ७ वाजेच्या सुमामास ट्रॉली दिसून न आल्याने दुचाकीस्वार समोरील ट्रॉलीवर जाऊन आदळला.
ट्रॉलीतील ऊस सरळ डोक्यात व गळ्यात घुसला
अपघात एवढा जोरात होता की ट्रॉलीतील ऊस संग्राम साबळे यांच्या डोक्यात व गळ्यात घुसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह जवळपास दीड तास घटनास्थळीच पडून होता. अपघाताची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे पोउपनि. विशाल सूर्यवंशी, अशोक रसाळ, गीते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह (dead body) पुढील कारवाईसाठी परभणी शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला. या घटनेची नोंद रात्री उशीरा घेण्यात आली.