नेपाळ (Nepal):- 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस शुक्रवारी तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत पडली, असे एएनआय ने नेपाळ पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे. तनहुन जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, बस नदीच्या काठावर पडली आहे.
बस नदीच्या काठावर पडली
जिल्हा पोलिस कार्यालय तनहुनचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, “यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस (Bus)नदीत पडली आणि नदीच्या काठावर पडली आहे.” ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, अधिकारी या दुर्घटनेत(accident) राज्यातील कोणी सामील आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार, ही बस गोरखपूरहून निघाली होती आणि तानपुनजवळ अपघात झाला. आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह(Dead Body) बाहेर काढण्यात आले आहेत, तर 16 जण गंभीर जखमी आहेत.
घटनास्थळावरून समोर आलेले व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारे
घटनास्थळावरून समोर आलेले व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारे आहेत. नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार सुरू असून बचावकार्य सुरू आहे. एका व्हिडिओमध्ये नदीच्या काठावर एक महिला डोके धरून बसलेली दिसत आहे. या वर्षी जुलै महिन्यात नेपाळमधील त्रिशूली नदीत (Trishuli river) दोन बसमधून प्रवास करणारे ६५ लोक वाहून गेले होते. काठमांडूहून रौतहाटला जाणाऱ्या एंजल बस आणि गणपती डिलक्समध्ये ही घटना घडली. परिसरात जोरदार पाऊस सुरू असताना ही घटना घडली.
200 लोकांचा मृत्यू तर 5000 बेघर
सशस्त्र पोलिस दल नेपाळ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शाळेतील वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखालील 45 सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांचे पथक आधीच अपघातस्थळी पोहोचले आहे आणि ते बचाव कार्य करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, “नेपाळमधील घटनेबाबत. बसमध्ये उत्तर प्रदेशातील कोणी व्यक्ती आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही संपर्क प्रस्थापित करत आहोत.” गेल्या महिन्यात मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर झालेल्या भूस्खलनात सात भारतीयांसह 65 जणांना घेऊन जाणाऱ्या दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या होत्या. त्यानंतर पाच भारतीयांचे (Indians) मृतदेह बाहेर काढण्यात आले.
वाहून गेलेल्या अनेक प्रवाशांचा शोध घेऊ शकले नाहीत
भारताच्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या 12 सदस्यीय टीमच्या तैनातीसह व्यापक शोध मोहीम असूनही, अधिकारी अद्याप दोन बेपत्ता बस आणि भूस्खलनात वाहून गेलेल्या अनेक प्रवाशांचा शोध घेऊ शकले नाहीत. 12 ऑगस्टपर्यंत, शोध पथकांनी आपत्ती स्थळापासून 103 किमी अंतरावर असलेल्या नारायणी नदीच्या काठावर आणि त्रिवेणी धरण परिसरात 25 मृतदेह बाहेर काढले आहेत. नेपाळच्या विविध भागांमध्ये संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन आणि पुरामुळे गेल्या दोन महिन्यांत जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 5,000 लोक बेघर झाले आहेत.