परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरातील मध्यवर्ती भागात पोस्ट ऑफीस (Post Office) रस्त्यावर रविवार रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास दोन गटात झालेल्या मारामारीच्या घटनेत तिघे जण जखमी झाले असून परस्परविरोधी दाखल दोन फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
१२ जणांविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पोस्ट ऑफीस रस्त्यावर रविवार रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तुझ्या सोबत राहणाऱ्या मुलांनी पेट्रोल पंपावर (Petrol pump)येऊन भांडणे का केली तुम्ही खूप माजलात असे म्हणत एका गटातील सात जणांनी दोघांना मारहाण केली तर माझ्या भावाला शिवीगाळ का करतो असे म्हणत दुसऱ्या गटातील पाच जणांनी एकाला मारहाण केल्याने दोन गटात लाठ्या, काठ्या, कुऱ्हाड, तलवार, लोखंडी रॉडने झालेल्या तुंबळ मारामारीत दोन्ही गटातील मंगल रुस्तुम गायकवाड, लंकेश बंडू बल्लाळ दोघे रा. लहुजी नगर गंगाखेड व पृथ्वीराज नितीनराव चौधरी रा. टोले गल्ली गंगाखेड हे तिघे जखमी झाले आहे.
दोन्ही गटातील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे
याप्रकरणी मंगल रुस्तुम गायकवाड वय ३५ वर्ष रा. लहुजी नगर गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रितीष चौधरी, अभिषेक चौधरी, ऋषिकेश चौधरी, निखिल दगडे, कृष्णा उर्फ सातबड्या गडचिले, पृथ्वीराज चौधरी, अक्षय चौधरी सर्व रा. गंगाखेड यांच्याविरुद्ध लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी पाठीवर, पायावर मुक्का मार मारत तलवारने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याच्या विविध कलमांसह जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पृथ्वीराज नितीनराव चौधरी वय २७ वर्ष रा. टोले गल्ली गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगल रुस्तुम गायकवाड, राम रुस्तुम गायकवाड, लखन रुस्तुम गायकवाड व अन्य दोन अनोळखी तरुणांनी लाठ्या, काठ्या, कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटल्यावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परविरोधी दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात एकूण बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गटातील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास अनुक्रमे स.पो.नि. आदित्य लोणीकर, स.पो.नि. शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.