दोन दुकानाचे शटर तोडून ७० हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागीने केले लंपास
आरमोरी (Daring Robbery) : आरमोरी शहरातील मुख्य मार्गांवरील सराफा मार्केट मध्ये असलेल्या सुभाष चौकातील’लक्ष्मी नारायण ज्वेलर्स’ या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७० हजार ५०० रुपयांचा चांदीचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी १७जानेवारी रोजी पहाटे ३.३० ते ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आरमोरी शहरातील सराफा दुकानदार धास्तावले आहेत.
प्राप्त माहीतीनुसार अनंता मनोहर बेहरे यांचे सराफा मार्केटमधील सुभाष चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. आज पहाटे शनिवारला तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.दुकानातील जुनी वापरती चांदीची मोड ज्यात तोरडी, लहान मुलाचे कडे, लहान मुलाचे वारे, कटली, असे एकूण ४७० ग्रॅम वजनाचा ७० हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला.
यानंतर चोरट्यांनी याच दुकाना लगत असलेल्या अरुण हर्षे यांच्या मालकीच्या हर्षे ज्वेलर्स कडे आपला मोर्चा वळविला. या चोरट्यांनी हर्षे ज्वेलर्सचे शटर तोडले. परंतु या दुकानाला चायनल गेट असल्याने चोरट्यांना दुकानाच्या आत प्रवेश करता आले नाही. यानंतर तिन्ही चोरटे एका मोटरसायकलवर तिब्बल सीट स्वार होवून मुख्य मार्गाने पसार झाले. विशेष म्हणजे चोरट्यांनी आपापल्या तोंडाला दुपट्टे बांधेलेले होते.
हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. पहाटे ५.०० वाजता नंतर काही महिला या रस्त्याने फिरायला जात असताना त्यांना दोन्ही ज्वेलर्सचे दुकानाचे शटर फोडलेले दिसले. त्यांनी लगेच ही माहिती लक्ष्मीनारायण ज्वेलर्सचे मालक अनंता बेहरे यांचे घरी जाऊन दिली.तसेच हर्षे ज्वेलर्सचे मालक अरुण हर्षे यांना कळविण्यात आले. बेहरे यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.यांच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ कलम ३०५ आणि ३११ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरमोरी पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करुन गडचिरोली येथून श्वानपथकाला पाचारण केले परंतु चोरांचा सुगावा लागला नाही. आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, व्यापार्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.




