Ind vs Ban:- भारत आणि बांगलादेश यांच्यात ग्वाल्हेरमध्ये खेळवण्यात आलेला टी-20 सामना बांगलादेशसाठी निराशाजनक ठरला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) चमकदार कामगिरी केली. भारतीय संघ चॅम्पियनसारखा खेळला आणि सामना जिंकला. हा सामना 7 गडी राखून जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी आणि नवे मैदान लक्षात घेऊन सूर्याने हा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजांनी तो योग्य दाखवला. अर्शदीप सिंगने पहिले दोन विकेट घेत बांगलादेशला गती मिळण्यापासून वंचित ठेवले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या पहिल्याच षटकात मेडन टाकून दमदार सुरुवात केली. यानंतर महमुदुल्लाहला आपला पहिला बळी बनवण्यात यश आले. बांगलादेशने एकापाठोपाठ एक विकेट गमावली पण मेहदी हसन(Mehadi Hassan) मिराझने काहीशी झुंज दिली. मेहदी हसनने नाबाद 35 धावा केल्या. इतर फलंदाज फ्लॉप झाले आणि अवघ्या 127 धावसंख्येवर संपूर्ण संघ सर्वबाद झाला. टीम इंडियासाठी पुनरागमन करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने चांगली गोलंदाजी करत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगनेही ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना भारताला पहिला झटका अभिषेक शर्माच्या रूपाने बसला, तो 16 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवने झंझावाती खेळी करत 29 धावा केल्या. संजू सॅमसननेही 29 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याने 39 धावांची नाबाद खेळी खेळली आणि 12व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.