लातूर (Latur) :- लातूर शहरातील खोरी गल्लीत असलेल्या हॉटेल (Hotel)गरम मसाला या हॉटेलला सोमवारी सकाळी आग (Fire) लागली. या आगीने तीन मजली इमारतीचा भाग व्यापून टाकला. दरम्यान परिसरातील दक्ष नागरिक व अग्निशामक दलाच्या (fire brigade) पथकाने या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घावटी कुटुंबीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाने घावटी कुटुंबीयांना सुरक्षित काढले बाहेर
खोरी गल्ली भागात असलेल्या हॉटेल गरम मसाला या हॉटेलला सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गफार घावटी यांचे हे हॉटेल आहे. साडेआठच्या सुमारास या हॉटेलमधून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पावले उचलत मदतीसाठी धावाधाव केली. तात्काळ लातूर महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. शेजारी व अग्निशामक दलाने प्राधान्याने सुरुवातीलाच हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर राहत असलेल्या घावटी परिवारातील पाच-सहा जणांना शिडीच्या साह्याने सुरक्षितरित्या अगोदर बाहेर काढले. यामुळे अनर्थ टळला.
दरम्यान या दुर्घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. हॉटेलच्या तळघरात लागलेल्या या आगीने संपूर्ण इमारत व्यापून टाकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फोडून इमारतीत दाटलेला धूर बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मदतकार्य सुकर झाले.