परभणी/गंगाखेड(Parbhani):- हॉटेलवर थांबलेल्या सिने तारकेला भेटण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी हॉटेल चालकास धक्का बुक्की करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार (दि. ७ ऑक्टोबर) रोजी रात्री ११ वाजेच्या शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या गोकुळ हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हॉटेल चालकाच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरात नवरात्र महोत्सवात आयोजीत गरबा डान्सच्या सादरीकरण कार्यक्रमासाठी आलेली लागिर झालं जी मालिका फेम सिने तारका शिवानी बावकर सोमवार (दि. ७ ऑक्टोबर) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास परळी रस्त्यावर असलेल्या गोकुळ लॉजींग अँड हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी थांबलेली असताना तिथे आलेल्या श्रीकांत गाढे, दिपक जाधव व अन्य दोघांनी आम्हाला शिवानी बावकरला भेटायचं आहे असे हॉटेल चालक श्रीधर मुरकुटे यांना सांगितले तेंव्हा तुम्हाला सेलीब्रेटींना(celebrities) भेटता येणार नाही. तुम्ही त्यांना लॉजींगच्या बाहेर आल्यावर भेटा आता तुम्हाला भेटता येणार नाही हॉटेल व लॉजींग माझी आहे असे श्रीधर मुरकुटे यांनी म्हणताच श्रीकांत गाढे, दिपक जाधव व अन्य दोघांनी त्यांना धक्काबुक्की करून अश्लील भाषेत शिवीगाळ(Abusing)करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद हॉटेल चालक मालक श्रीधर मुरकुटे यांनी मंगळवार (दि. ८ ऑक्टोबर) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक असद शेख हे करीत आहेत.