परभणी/पाथरी (Parbhani):- नुकत्याच झालेल्या राज्य विधान परिषद निवडणुकीमध्ये(Legislative Council Elections) निवडूण आलेले आ .राजेश विटेकर यांचा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या (Shiv Sena Party) वतीने शुक्रवार १९ जुलै रोजी पाथरी शहरात भव्य स्वागत करत नागरी सत्कार करण्यात आला .
आमदार विटेकर यांच्यावर फुलांची उधळण
विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे शुक्रवारी सकाळी ११ वा . सुमारास परभणी जिल्ह्यामध्ये आगमन झाले. पाथरी शहरामध्ये शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आ .विटेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षातील कार्यकर्त्यांनी आष्टी फाटा पासुन मोटरसायकल रॅली काढली होती. नवा मुंडा परिसरातील शिवसेना भवन येथे सहा जेसीबी (JCB) मधून आमदार विटेकर यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी क्रेन च्या माध्यमातून पाचशे किलोचा पुष्पहार आ .विटेकर यांना घालण्यात आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरा शेजारील अंजली मंगल कार्यालय येथे आयोजीत कार्यक्रमात आमदार राजेश विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार राजेश विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना नेते चक्रधर उगले यांनी तर मा.आ.माणिकराव आंबेगावकर, सोनपेठ न.पा. चे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, मा.जि.प.सभापती दादासाहेब टेंगसे, सारंगधर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसेफ खान, शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर,अनिल ढवळे, सतिष वाकडे, दिलीप हिवाळे, साजेद राज यांच्यासह मोठ्या संख्येने पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती .
महायुतीच्या माध्यमातून मी लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली
महायुतीच्या माध्यमातून मी लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी जागा जाणकर यांना सोडल्याने मी तयारी करूनही माघार घेतली. पक्षाने माझ्यावर आता जिम्मेदारी दिली आहे. ग्रामपंचायत पासुन ते जिल्हा परिषद आता विधानपरिषद सदस्य माझा प्रवास झाला आहे. येणाऱ्या काळात जिल्हासह पाथरी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्याचा माझा संकल्प आहे. मी शहरात येण्याच्या आधी कोणीतरी पाथरी बंदचा प्रयत्न केला. फोटो लावून शुभेच्छा दिल्या नाहीत परंतु लोकांच्या मनात माझा फोटो असुन त्यांचे प्रेम माझ्या पाठीशी आहे. आगामी काळात महायुतीच्या आमदार निवडून आणायचा आहे .त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे- आ . राजेश विटेकर