कारंजा (Washim):- धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात (Accident) पुणे येथील पती, पत्नीसह मुलगा जखमी झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७५ वरील दोनद बु. गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, पुणे येथील भलमे कुटुंबीय एमएच १२ एसवाय ११६४ क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावरून नागपूरला जात होते. अचानक धावत्या कारचा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण(Control) सुटून कार दुभाजकाला धडकली. या घटनेत डॉ. नितीन विठ्ठलराव भलमे (४८), प्रियंका नितीन भलमे (३७ ) व दानिश नितीन भलमे (७ सर्व रा.बालेवाडी पुणे) जखमी झाले. तर मृणाल भलमे (१४) ही सुखरूप बचावली. दरम्यान, घटनेची माहिती रुग्णसेवक रमेश देशमुख यांना समजताच त्यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी महाराज रुग्णवाहिकेचे (Ambulance)चालक नितीन पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. तेथून जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. येथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले.