हिंगोली(Hingoli):- हिंगोली ते सेनगाव मार्गावर सेनगाव शिवारामध्ये भरधाव आयशर टेंम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Deaths)झाल्याची घटना गुरुवारी १० ऑक्टोबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गणेश शंकर मुंडे (४०) व सविता गणेश मुंडे (३५ रा सावरखेडा ता सेनगांव ) अशी मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुचाकी वरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील गणेश मुंडे व त्यांची पत्नी सविता मुंडे हे आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर घोटा देवी येथे नवरात्र महोत्सवामुळे तुळजादेवीच्या (tuljadevi)दर्शनासाठी आले होते. या ठिकाणी दर्शन घेऊन दोघेही गावातच सविता यांच्या माहेरी गेले होते. त्या ठिकाणी जेवण आटोपून रात्रीच्या सुमारास दोघे दुचाकी वाहनावर सावरखेडा गावाकडे निघाले होते. दरम्यान त्यांचे दुचाकी वाहन सेनगाव शिवारात आले असताना हिंगोली कडून सेनगाव कडे भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामुळे गणेश यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या अपघातात गणेश व त्यांची पत्नी सविता यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळी सोडून काढला पळ
या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, उप निरीक्षक स्वामी, जमादार सुभाष चव्हाण, अंबादास गायकवाड, निरंजन अंभोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळी सोडून पळ काढला. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन सेनगाव पोलीस ठाण्यात आणून उभा केला आहे. दरम्यान शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह सावरखेडा व घोटा येथील गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) गर्दी केली होती. मयत गणेश मुंडे यांच्या पश्चात आई-वडील एक मुलगी व एक मुलगा असा परिवार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे सावरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.