पुसद(Pusad) :- महागांव तालुक्यातील पोहंडूळ येथे एका विधवा महिलेची मागील १५ वर्षापासून फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहण्यासाठी घरकुल व शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन देऊन त्या महिलेची आर्थिक पिळवणूक करण्यात आली आहे. रेखा श्रीराम रावते रा.पोहंडूळ असे फसवणूक झालेल्या विधवा महिलेचे नाव असून पिडित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे .
महिलेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; पोहंडूळ येथिल प्रकार
पोहंडूळ येथील रहिवासी रेखा श्रीराम रावते यांच्या पतीने मागील पंधरा वर्षांपूर्वी कर्जाला कंटाळून व नापीकी मुळे आत्महत्या(suicide) केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गावातील माजी सरपंच,ग्रामसेवक व काही संबंधित नागरिकांनी आर्थिक देवाण-घेवाण करून फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्या महिलेला अद्यापही कुठल्याही प्रकारची मदत मिळवून दिली नाही. त्या महिलेला राहण्यासाठी घरकुल योजना मंजूर करून देतो असे सांगून त्या महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. नेहमी फसवणूक होत असल्याने त्या त्रस्त महिलेने अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली व संबंधित नागरिक व माजी सरपंच यांच्या वर कारवाई करून घरकुलाचा लाभ द्या अशी मागणी केली.