कोलकाता दुर्गापूजा मंडप चेंगराचेंगरी

दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; 19 जणांचा मृत्यू, सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Kolkata Durga Pandal Stampede: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे महासप्तमीच्या रात्री दुर्गापूजेच्या मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत 19 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमध्ये दोन मुल...

दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; 19 जणांचा मृत्यू, सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Kolkata Durga Pandal Stampede

 

चोरबागानच्या प्रसिद्ध दुर्गापूजा मंडपातील दुर्घटनेची SIT मार्फत चौकशी

कोलकाता (Kolkata Durga Pandal Stampede) : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे महासप्तमीच्या रात्री दुर्गापूजेच्या मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत 19 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून, 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोठ्या दुर्गापूजा मंडपांमधील प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कोलकात्यातील 91 वर्षे जुना आणि प्रसिद्ध असलेल्या चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात ही दुर्घटना घडली. या प्रकरणी आयोजकांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये 13 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक विद्यार्थिनी आणि एक परिचारिका असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी (CM Shubhendu Adhikari) यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. (Kolkata Durga Pandal Stampede) दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचा दावा वैद्यकीय सूत्रांकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे वाढली गर्दी; प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी

शनिवारी सायंकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी मंडपात उपस्थित असलेले शेकडो भाविक आतमध्येच थांबले. त्याचवेळी बाहेर उभ्या असलेल्या मोठ्या गर्दीनेही मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. (Kolkata Durga Pandal Stampede) सायंकाळी सुमारे 7.40 वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वारावर मोठी गर्दी जमा झाली. एकाच वेळी अनेक लोक आत जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर काही जण खाली पडले आणि त्यांच्यावर इतर लोक पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. गोंधळ वाढल्यानंतर मंडपातील दिवे बंद करण्यात आले आणि प्रवेश पूर्णपणे थांबवण्यात आला. मात्र, तोपर्यंत अनेक भाविक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

91 वर्षांची परंपरा असलेला चोरबागान मंडप

चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडप कोलकात्यातील प्रसिद्ध मंडपांपैकी एक मानला जातो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आणि आकर्षक सजावटीमुळे या मंडपाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. यंदा मंडपाची संकल्पना ‘बियॉन्ड साउंड’ अशी होती. ध्वनी आणि गोंगाटापलीकडील शांतता व ध्यानमग्न वातावरण दाखवण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला होता. या (Kolkata Durga Pandal Stampede) मंडपाला यंदा राज्य सरकारकडून ‘सेरार सेरा’ अर्थात उत्कृष्ट मंडपांमधील सर्वोत्तम मंडप हा सन्मान मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ‘देवी दुर्गा सन्मान 2026’ पुरस्कारही मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 2025 मध्ये ‘स्रोतोस्विनी’ या संकल्पनेतून काळानुसार होणारा विकास दाखवण्यात आला होता, तर 2024 मध्ये ‘दुग्गा’ या संकल्पनेतून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला होता.

सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दुर्गापूजेच्या काळात चोरबागान मंडपात भाविकांची मोठी गर्दी होत असते. (Kolkata Durga Pandal Stampede) अशा परिस्थितीत प्रवेशद्वारावरील गर्दीचे नियोजन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि संभाव्य निष्काळजीपणाची जबाबदारी एसआयटीच्या तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. उत्साहाने सुरू असलेल्या दुर्गापूजा उत्सवाला या दुर्घटनेमुळे गालबोट लागले आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.