आमच्याविषयी…
‘देशोन्नती’.(१९८४) मध्ये स्थापित ‘देशोन्नती’, हे सुरूवातीला शेतकऱ्यांना आणि अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसह समाजातील सर्वच घटकांना समर्पित एक विश्वासार्ह ब्रँड, विदर्भ पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड माध्यम समूहाचे प्रकाशन आहे. शेतकरी आत्महत्यांचे वास्तव उजेडात आणणे, शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत घटकांवर सातत्याने ‘प्रकाश’ टाकणे, शेतकऱ्यांना वास्तविक माहिती आणि नवीनतम ज्ञानाने सुसज्ज करणे आणि त्यांच्या उत्पन्नाची पातळी वाढविण्यात मदत करणे या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते; जे आज केवळ शेतकरीच नव्हे, तर समाजातील सर्वच घटकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यात एक यशस्वी दैनिक ठरले. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करणारं हे एक मराठीतलं पहिलंवहिलं आणि एकमेव स्वतंत्र दैनिक आहे. सर्व अपेक्षांना मागे टाकत, ‘देशोन्नती’ने वाचकसंख्या वाढवली आहे. या लोकप्रियतेचे श्रेय ‘देशोन्नती’च्या शेती आणि ग्रामीण विकासाच्या समंजस आणि सखोल ‘कव्हरेज’ला दिले जाते.
• प्रकाश पोहरे, मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक
श्री. प्रकाश पोहरे हे यशस्वी उद्योजक, शोध पत्रकार, साहित्यिक आणि दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत. ते (१९९०) पासून ‘देशोन्नती’ समूहाचे मुख्य संपादक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्राने गरुडझेप घेतली. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व असलेले ‘देशोन्नती’ हे आता केवळ ‘वृत्तपत्र’ म्हणून मर्यादित राहिलेले नाही, तर तो स्वतःचा ‘ब्रँड’ झाला आहे. १९८०मध्ये शेतकरी संघटना स्थापन झाली आणि तिथूनच पोहरे यांनी असंख्य शेतकरी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ते शेतकरी नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले आहेत. त्यांचे ‘प्रहार’ हे सदर तळागाळातील वाचक वर्गामध्ये वाचले जाते व त्यावर सामूहिक चिंतन केले जाते. पोहरे यांच्या नेतृत्वात सुरूवातीलाच ‘देशोन्नती’ समूहाने कृषकोन्नती हे केवळ शेती आणि शेतकऱ्यांना समर्पित राज्यातील पहिले मराठी साप्ताहिक, तसेच नागपूरहून प्रकाशित होणारे राष्ट्रप्रकाश हे हिंदी दैनिक सुरू केले. प्रकाश पोहरे यांच्या शब्दांचा आधार घेत असं म्हणता येईल की, मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे. अनेक माणसं नाइलाज म्हणून मतभेद सहन करतात, आमचं तसं नाही. आमच्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयीही आम्हाला आस्था आहे. कारण वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णत्वाला जात असतो. त्यामुळे ‘देशोन्नती’वर नेहमीच मतभेदांचं स्वागत केलं जाईल, फक्त त्यामागे सद्हेतू असावा; व्यक्ती, संस्था, पक्ष, वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा व्यापक समाजहित असावं. आधुनिक जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर भारतीय राज्यघटना उभी आहे. या मूल्यांचं आपल्या परीनं रक्षण करणं हे ‘देशोन्नती’चंही धोरण असेल.
• ऋषिकेश पोहरे, व्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी संपादक
श्री. ऋषिकेश पोहरे हे आत्ताचे ‘देशोन्नती’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पात्रतेनुसार ऋषिकेश हे ‘देशोन्नती’ माध्यम समूहाचा वारसा नवीन उंचीवर नेण्यात उत्कटतेने सहभागी झाले आहेत. सखोल अनुभव, सामाजिक वारसा आणि उत्तम व्यवस्थापन कौशल्य, याद्वारे ते समूहाचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळत आहेत. ‘देशोन्नती’ माध्यम समूहाने श्री. ऋषिकेश प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली आजच्या आधुनिक काळात देशोन्नती डिजिटल चॅनेल व ऑनलाईन न्युज पोर्टल सुरू करून अधिक उंची गाठली आहे. याच्याच जोडीला समूहाच्या संचालिका आदिती ऋषिकेश पोहरे यांच्या नेतृत्वात ‘मनस्विनी’च्या माध्यमातून इव्हेंट्स, प्रदर्शने आणि विविध सामाजिक उपक्रम देखील आयोजित केले जातात.
आज आपल्यावर अनेक गोष्टी सातत्यानं येऊन आदळत आहेत. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि काय नाही, अर्थातच समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या भाषेत…‘रद्दी हवी की बुद्धी?’, याचा दृष्टिकोन देण्याचं काम हा ‘देशोन्नती’चा उद्देश आहे.
‘देशोन्नती’मध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आम्हाला त्यांच्या सूचना आवर्जून कळवाव्यात. प्रत्येक माध्यमाची काही सामर्थ्यं असतात, तशा काही मर्यादाही असतात. परंतु त्या मर्यादांवर मात करत स्वत:ची आणि आपल्या वाचकांची अभिरुची जोपासण्याचा आमचा प्रयत्न असेल. अर्थात, हे आव्हान आमची संपादकीय टीम महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि देशाबाहेरच्या मान्यवर लेखकांच्या बळावरच पेलू शकणार आहे. कारण कुठल्याही माध्यमाचा कस हा त्यासाठी लेखन करणाऱ्या लेखकांवरच अवलंबून असतो.
कळावे. लोभ असावा.
– देशोन्नती