वाशिम (Washim):- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. महायुतीच्यावतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा वाशीम येथील रिसोड रोडवरील झांजरी लेआउट लाखाळा येथे घेण्यात आली.
सभेत महायुतीतील घटक पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला
या सभेत महायुतीतील घटक पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. महायुतीमध्ये वाशिम- मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) भारतीय जनता पक्षाच्या वाट्यावर आला असून उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंतर्गत वाद उफाळून आला. भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यात आली परंतु सभेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा होती. महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असून एवढ्या महत्त्वाच्या सभेला शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच महायुतीतील इतर घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभेतील अनुपस्थिती नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरली.त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) नंतर सर्वात जास्त मागणी असलेल्या योगी आदित्यनाथ यांची सभा असतानाही सभेला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याची मतदारांमध्ये चर्चा होती. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीला महाअनाडी आघाडी संबोधित करून विरोधकांवर कठोर भाषेत तोफ डागली.