कारंजा(Karanja):- मागील काही दिवसांपासून स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर (Samruddhi highway)अपघाताची मालिका सातत्याने सुरू असतानाच बुधवारी 29 मे रोजी सकाळी तीन तासात कारंजा तालुका हद्दीत अपघाताच्या दोन घटना घडल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. ट्रक आणि कार अपघाताचा यात समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघाताची(Accident) मालिका संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.
एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
29 मे रोजी पहाटे साडे 6 वाजता च्या दरम्यान कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीत लोकेशन 188 वर एका ट्रकने समोरील ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात घडला यात योगेश निवृत्ती खैनार वय 39 यांचा मृत्यू झाला.तर प्रदीपसिंग जसवंतसिंग मान वय 35 वर्ष हा गंभीर जखमी झाला. मृत चालक हा नाशिक (Nashik)जिल्ह्यातील लासनगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार नाशिक येथून एक ट्रक ऊस घेऊन ओडिसा येथे जात असताना मार्गातील अपघात स्थळी समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारले त्यामुळे हा ट्रक मागून समोरील ट्रकला धडकला त्यामुळे हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की मागील ट्रकचा चालक केबिनमध्ये (Cabin)अडकला व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर समोरच्या ट्रक मधील चालक सुद्धा गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच कारंजा लोकेशन 108 रुग्णवाहिकेचे पायलट आतिश चव्हाण, डॉ मुदसिर, श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे (Ambulance) चालक तथा रुग्णसेवक रमेश देशमुख, महाराष्ट्र सुरक्षा बल(Maharashtra Security Force), अग्निशामन दल(fire brigade), लोकेशन समृद्धी महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्या चालकाला ट्रकच्या केबिन मधून जेसीबीच्या (JCB)मदतीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
कार अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले
तर अपघाताची दुसरी घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 9 वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील लोकेशन 168 वर घडली. यावेळी कार अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. पवन सिंग अरुण सिंग वय 42 वर्ष , शैलेंद्र कुमार तिवार वय 42 वर्ष व दीपक दुबे जखमींची नावे असून हे सर्व पुणे येथील रहिवासी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एम. एच. 14 एच. डब्ल्यू. 4469 क्रमांकाच्या कार ने तिघेजण पुणे येथून मध्य प्रदेशातील सुलतानपूरकडे जात असताना मार्गातील अपघात स्थळी कारचालकाचे भरधाव कार वरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली. अपघाताच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तपासणी दरम्यान ट्रक अपघातातील एकाला मृत घोषित करण्यात आले तर उर्वरित चौघा जणांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ता.प्र