परभणी (Parbhani):- जिल्हा जलसंधारण (water conservation) अधिकार्यांनी कोल्हापुरी बंधारा प्रकरणी अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता व संबंधीतांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी पठाण हमीद खान शेरखान यांनी गुरुवार १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा जलसंधारण अधिकार्यास निलंबित करा
जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे यांनी शासकीय अभिलेख्यात खाडाखोड करून कोथाळा ता. परभणी येथील कोल्हापुरी बंधारा मानवत ता. मानवत येथे बांधल्याचे सांगुन शासनाची फसवणूक (Fraud) केली आहे. याबाबत तत्कालिन उपविभागीय अभियंता यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या प्रकरणी जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे व संबंधीतांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी पठाण हमीद खान शेरखान यांनी स्वातंत्र्य दिन (independence day) १५ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र सहाव्या दिवशीही उपोषणाची दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले. निवेदनावर पठाण हमीद खान शेरखान यांची स्वाक्षरी आहे.
चौकशीत सर्व स्पष्ट होईल
सदरील आमरण उपोषणा संदर्भात कार्यालयास कुठलिही पुर्व सुचना देण्यात आलेली नाही. या विषयी वरिष्ठ स्तरावर चौकशी अहवाल पाठविण्यात आला आहे. चौकशीनंतर सर्व बाबी स्पष्ट होतील.