परभणी (Parbhani) :- बोरी पोलीस ठाणे हद्दितील गव्हा गावातील शेत आखाड्यावरुन ६५ पोते सोयाबीन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत चोरीला गेलेले सोयाबीन, चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन आणि चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी संबंधितांना बोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
परभणीच्या बोरी पोलीस ठाणे हद्दितील घटना
गव्हा येथील नारायण गुलाब मोरे यांच्या शेत आखाड्यावरुन सोयाबीन चोरीला गेल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी बोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने गोपनीय तपास करत सापळा रचून दलबीरसिंग टाक याला ताब्यात घेतले. संबंधिताने कृष्णा सिंग टाक, गोपाल सिंग टाक, प्रदुम उर्फ हरभजनसिंग टाक, शंकर उर्फ साई डहाळे, सुरज पाल यांना ताब्यात घेतले. संबंधितां जवळून ६५ पोते सोयाबीन आणि चारचाकी वाहन मिळून १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील, पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, सिध्देश्वर चाटे, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, संजय घुगे, हुसैन, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, स्वप्नील पोतदार यांच्या पथकाने केली.