अकोला (Akola):- क्षेत्र कोणतेही असो, त्यात यश मिळवायचे असेल तर त्याबाबतच्या योग्य ज्ञान संपादनाची गरज आहे. त्याशिवाय यशप्राप्ती होणे अशक्य आहे. यामध्ये प्रारंभी चूका होतीलही; परंतु, या चूकांतून संधी शोधायची असते. आज शेतकरीसुद्धा योग्य ज्ञानाआधारे शेतीत यशस्वी होत आहेत. पाणी फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून राज्यात सुरुवातील सोयाबीन (soybeans) शेतकऱ्यांना शिक्षित करण्याचे काम करु लागले. आता २६ पिकांवर शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिने अभिनेता आमीर खान यांनी आज येथे केले.
शिवार फेरी; प्रक्षेत्रांना दिली भेट शास्त्रज्ञांचे केले कौतुक
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या(Agricultural University) स्थापनादिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शिवारफेरीत दुसऱ्या दिवशी शनिवार, २१ सप्टेंबर रोजी आमिर स्वतः सहभागी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांसोबत त्याने संवाद साधला. कार्यक्रमाला कुलगुरु डॉ. शरद गडाख, आ. अमोल मिटकरी, आ. अमित झनक, सत्यजित भटकळ, अविनाश पोळ यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागप्रमुखांची उपस्थिती होती. पुढे आमिर खान म्हणाले, शेतकऱ्यांना ज्ञानी करण्याचे काम कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ (scientist) करीत आहेत. या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून विविध प्रकारचे ज्ञान पाणी फाउंडेशनच्या पुढाकारानेही शेतकऱ्यांपर्यत शेतीशाळांद्वारे पोचवले जात आहे. खरे ज्ञान हेच आपल्या यशाचे गमक असते. शेतकऱ्यांनी, नागरिकांनी नेहमी सकारात्मक विचार जोपासला पाहिजे. अनेकदा आपण केलेल्या चुका सुद्धा शिकवत असतात. जसे ज्ञानामुळे यश मिळते तसेच चुकांतून आपल्याला शिकवण मिळते, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी कौतुकही केले. कुलगुरु डॉ. गडाख यांनी प्रास्ताविकात विद्यापीठांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. किशोर बिडवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तत्पुर्वी आमीर खान यांनी कुलगुरु डॉ. गडाख, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्यासह विविध प्रक्षेत्रांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.