दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; पुण्याच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
पुणे- नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सचिन, शरदला जन्मठेपेची शिक्षा
पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्याचवेळी न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद काळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
दाभोलकर कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारी वकिलांनी सांगितले की, ते या निकालाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस, गुन्हे शाखा आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोसह अनेक यंत्रणांनी केला.
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते.