मानोरा(Washim):- तालुक्यातील कोंडोली व आसोला बु. या परिसरात अवैध रेती उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या आदेशानुसार फिरते अवैध गौनखनीज पथकांनी कारवाई (action) केली. या कारवाईत कोंडोली येथील अरुणावती नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने अंदाजे एक ब्रास रेती गाळून काढलेली आढळून आली. सदर रेती ही मोक्कास्थळी जप्त करून आसोला बु. येथील घरकुल लाभार्थी सुभाष हरिभाऊ इंगोले यांच्या ताब्यात निःशुल्क देण्यात आली. सदर कारवाई पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार संदीप आडे, मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, तलाठी भालेकर यांनी केली. यावेळी पोलीस पाटील गोपाल इंगोले, कोतवाल खडसे आदी उपस्थित होते. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज (Illegal minor minerals) करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मोठी कारवाई करण्याची गरज!
तालुक्यातील गोखी नदी, चाकुर नाला, अरुणावती नदी पात्रातून दिवस रात्र ट्रॅक्टरने अवैध रेती उपसा सुरू आहे. त्याचप्रमाणे रतनवाडी , रुई , गोस्ता, शेंदूरजना आढाव, भिलडोंगर, व देवठाणा, सोमनाथनगर आदीसह इतर ठिकाणावरून गौण खनिजाची चोरी राजरोसपणे खुलेआम जे सी बी मशीनने उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. यात काही महसूल विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी आपले हात ओले करत असल्याची चर्चा जागरूक नागरिकांमधून होत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करण्याची मागणी निसर्ग प्रेमी बंधवाकडून होत आहे.