दिन विशेष
अभिनेते राजकुमार यांचा आज स्मृतिदिन
– संजय भराडे
परभणी (Actor Raaj kumar) : ’जानी हम तुम्हे मारेंगे, और जरूर मारेंगे’ … लेकिन तब, जब बंदूक भी हमारी होगी… गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा’ १९९१ साली प्रदर्शित सौदागर या चित्रपटातील डायलॉग अजरामर करणारे बॉलिवूडमधील ’जानी’ अर्थात (Actor Raaj kumar) अभिनेते राजकुमार यांचा आज ३ जुलै रोजी स्मृतिदिन आहे. रुपेरी पडद्यावर ‘जानीऽऽ’ या ’वन अॅण्ड ओन्ली’ शब्दाने आपल्या खास खरखरत्या आवाजातल्या; पण अनोख्या ताकदीच्या संवादफेकीच्या जोरावर स्वतंत्र अभिनयशैलीचा ठसा उमटविणारे, डॉयलॉगचे बेताज बादशहा, बॉलीवुड अभिनेते राजकुमार यांचा ८ ऑक्टोबर १९२६ ला बलुचिस्तानात जन्म झाला.
आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलीस स्टेशनमध्ये (Mumbai Police) ते इन्स्पेक्टर म्हणून काम करु लागले. राजकुमार यांचा चालण्या-बोलण्याचा हटके अंदाज पाहून त्यांना त्यांच्या हाताखाली असलेला पोलिस शिपाई एकदा ‘सर, तुम्ही चित्रपटातल्या नायकापेक्षा कुठेही कमी दिसत नाही. शिपायाचे हे वाक्य राजकुमार यांच्या डोक्यात भिनले होते. एकदा पोलिस ठाण्यात चित्रपट निर्माते बलदेव दुबे कामानिमित्त आले असता त्यांनी (Actor Raaj kumar) राजकुमार यांना आपल्या ‘शाही बाजार’ या चित्रपटात भूमिका करण्याची ’ऑफर’ त्यांना दिली व शिपायाच्या वाक्याची आठवण झालेल्या राजकुमार यांनी ती स्वीकारली. उपनिरीक्षकपदाचा राजीनामा देऊन राजकुमार चित्रपटसृष्टीत आले. ’मदर इंडिया’ या चित्रपटातील शेतकर्यांच्या भूमिकेने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. पैगाम, काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले.
पाकिजा या चित्रपटातील ’’आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे’ हा संवाद एवढा लोकप्रिय झाला की, बहूतांश अभिनेता, कॉमेडियननी त्या संवादशैलीची कॉपी केलेली दिसून येते. ’वक्त’ सिनेमातील ‘चिनॉय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते’ हा त्यांचा डायलॉग आजही ताजातवाना असून अतिशय प्रसिध्द आहे. बुलंदी, कुदरत, धर्मकांटा, शरारा, राजतिलक, एक नयी पहेली, मरते दम तक, सुर्या, जंगबाज, पुलिस पब्लिक आदी चित्रपट सुपरहिट ठरले.
९०च्या दशकात राजकुमार यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. अनेक सुपरहिट सिनेमांत काम करून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणार्या (Actor Raaj kumar) राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ रोजी कॅन्सरने मुंबईत निधन झाले.