गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांचे प्रतिपादन
उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान
देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती (Amravati sweep) : अमरावती तालुका स्विपच्या टीमने कौतुकास्पद व उल्लेखनीय काम केल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी केले. विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढल्याने मतदार जनजागृतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
अमरावती पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अंकिता लाड, तालुका नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमंती अर्चना ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधिर खोडे, अजित पाटील आदींची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अमरावती तालुका स्वीप कक्षांतर्गत दररोज शाळा किंवा गावात विविध उपक्रम राबविले होते. त्यात चित्रकला व मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी काढून मतदार जनजागृती करण्यात आली. यादरम्यान, अमरावती तालुका स्वीप कक्षाच्या पथनाट्याने धूम केली होती. त्याचा प्रभाव मतदारांवर झाल्याने विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली.
या (Amravati sweep) सन्मान सोहळ्यात गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, सुधिर खोडे, विनायक लकडे, संजय पुनसे, अविनाश सरोदे, पुष्पा चिखलकर, आशिष गाडेकर, संदीप राऊत, सुनंदा राठोड, अफसर खान, राजेंद्र दीक्षित, किशोर मालोकर यांच्यासह गटासाधन केंद्राच्या वैशाली वऱ्हाडे, नलिनी गोरे, कविता उघडे, अश्विनी पोकळे, सारिका काळे, संगीता रूपनारायण, सचिन वानखडे यांचा गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षण, पंचायत, आरोग्य, बालविकास प्रकल्प आदी विभागातील कर्मचार्यांसह ग्राम पंचायत अधिकारी यांची उपस्थिती होती. प्रास्तविक शिक्षण विस्तार अधिकारी सुधिर खोडे यांनी केले. संचालन वैशाली वऱ्हाडे यांनी तर आभार अफसर खान यांनी मानले.
उल्लास मेळाव्यातील टीमचादेखील सत्कार
नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत विभागीय उल्लास मेळाव्याचे आयोजन अकोला येथे नुकतेच करण्यात आले होते. सदर मेळाव्यात (Amravati sweep) अमरावती पंचायत समितीने उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. माझे कुटुंब व शेजार या स्टॉलसाठी मिळालेल्या थिमवर आधारीत दर्जेदार साहित्याची मांडणी करुण सर्वांचे लक्ष वेधून घेतले . स्टॉलला उत्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. नवभारत साक्षरता अभियान टीम मधिल तालुका समन्वयक कविता उघडे विषय साधन व्यक्ती, छाया मिरासे विषय साधन व्यक्ती, मनोज खोडके, सुवर्णा मेश्राम (स्वयंसेवक), सुमन तायडे ( नवसाक्षार) यांचादेखील यावेळी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.