परभणी (Parbhani):- प्रलंबीत असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी पदवीधारकांनी(Agriculture graduate) शुक्रवार ५ जुलै रोजी कुलगुरु यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले.
प्रलंबीत मागण्यांकडे वेधले लक्ष
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील(Agricultural University) कुलगुरुंनी मागण्यांकडे लक्ष देवून सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी कृषी पदवीधारकांनी केली आहे. धरणे आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन वनामकृविच्या कुलगुरुंना सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने कृषी पदवीधारकांची उपस्थिती होती.
या मागण्यांसाठी आंदोलन:
मागील दोन वर्षात पात्रताधारक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी परीक्षा न घेता फेलोशिप द्यावी, संशोधन अधिछात्रवृत्ती न मिळणार्या विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरावर अर्थसहाय्य पुरवणारी कमवा आणि शिका या धर्तीवर योजना कार्यान्वीत करावी, आचार्य पदवी अभ्यासक्रमाला व्यवसायिक दर्जा प्रदान करावा, कृषी पदवीधारकांची नियुक्ती करावी, रखडलेल्या भरत्या पूर्ण कराव्यात, विद्यापीठातील सर्व वसतीगृहात (Hostel) आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमास मंजुरी द्यावी, ग्रामसेवक व तलाठी पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता कृषी पदवीका व कृषी पदवीधर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.