हिंगोली (Hingoli):- महावितरणच्या चाळणी शाखेत रोहित्र वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचार्यांविरूद्ध कारवाई करावी यासाठी मागील पाच दिवसांपासून येथील महावितरण कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास बसलेले शेतकरी (Farmer)नेते डॉ. रमेश शिंदे हे महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा करीत असताना बेशुद्ध पडल्याने त्यांना येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिंदे यांनी रोहित्र वाटपातील गैरव्यहार चव्हाट्यावर आणल्याने महावितरणचे अधिकारी चांगलेच गोत्यात आले आहेत.
चर्चेदरम्यान आली भोवळ, खाजगी रूग्णालयात उपचार सुरू
17 ऑक्टोबरपासून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील विज प्रश्नावरून येथील महावितरण कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास डॉ. रमेश शिंदे बसले आहेत. त्यांनी महावितरणकडून (Maha distribution) विज रोहित्र वाटपात गैरव्यवहार केल्याचे यादीसह प्रशासनास दाखवून दिल्याने महावितरणचे अधिकारी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी असा आग्रह करीत पाचव्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले होते. दुपारी 3 च्या सुमारास नांदेड परिमंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंगोलीचे अधिक्षक अभियंता एम.आर. चव्हाण, कार्यकारी अभियंता मुंंजारे यांच्यासह पोलीस अधिकार्यांच्या समक्ष उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. डॉ. शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाहीत यावर ठाम होते. चर्चेदरम्यान अचानक शिंदे बेशुद्ध पडल्याने एकच धावपळ उडाली. त्यांना तात्काळ हिंगोली शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल (Hospital)मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. परंतू मागील पाच दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शेतकर्यांच्या रोहित्रांसाठी आक्रमक भुमिका घेत डॉ. शिंदे यांनी रोहित्र वाटपातील गैरव्यवहारही उघडकीस आणल्याने महावितणच्या अधिकारी व कर्मचार्यांची पाचावर धारण बसली आहे.