लातूर (Crop insurance) : लातूरात कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालयाच्या गुणनियंत्रण विभागात एक टेबल आणि एक खुर्ची ठेवलेली आहे. कृषी पीक विमा कंपनीचे टेबल सतत रिकामाच असून ना कॉप्म्प्यूटर, ना माहिती, माणूस कोणी बसतच नाही. कृषी कार्यालय त्या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्यामुळे ‘कृषी अधीक्षकांचे काही चालेना अन् पीकविमा कंपनीचे लोक टेबलला थांबेनात’, अशी गत झाली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी नाहीत. त्यामुळे दररोजच्या दररोज कृषी कार्यालय, कृषी गुणनियंत्रण विभाग (Crop insurance) पीकविमा योजना कंपनी आदी जणांकडून समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदतीची आस घेऊन जिल्ह्यातील शेतकरी दररोज खेटे घालत आहेत. मात्र त्यांचे ऐकून घेण्यासाठी कोणीही उपलब्ध होत नाही. कधी अधिकारी व्ही. सी. मध्ये तर कधी मिटींग तर कधी दौरे आदी बहाण्याने उपस्थित रहात नसल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कधी लोकसभेच्या निवडणुका संदर्भात व्ही. सी. तर कधी कांही योजना, तर कधी मिटींग, दौरे आदी कामाच्या नावाखाली आठवड्यातील पाच दिवस निघून जात आहेत. पुन्हा शनिवार, रविवार, प्रशासकीय सुट्टीत असे काम प्रशासकिय कार्यालयातील कृषी विभागात सुरू असून यामुळे शेतकरी, लाभार्थी, कृषी विमा धारक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.