सभापतीच नव्हे, तर तालुक्याचे कारभारीही ठरले तोडगा काढण्यात अपयशी!
अहमदपूर (Ahmedpur Bazaar Samiti) : शेतकरी हिताच्या बाजार गप्पा मारणाऱ्या नेत्यांच्या निष्क्रियतेने अहमदपूर तालुक्यामध्ये अक्षरश: कळस गाठला आहे. गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेल्या अहमदपूर बाजार समितीच्या प्रकरणात तोडगा काढण्यात बाजार समिती सभापती व संचालक मंडळच नव्हे, तर तालुक्याचे कारभारी असणारे आमदारही अपयशी ठरले आहेत. यामुळे अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ऐन सणासुदीत अहमदपूर बाजार समिती (Ahmedpur Bazaar Samiti) तब्बल दहा दिवस बंद आहे. खरेदी शेतमालाची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप करीत अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्यांनी बाजार समितीला पत्र लिहून बेमुदत बंदची हाक दिली. याविषयी खरेदीदार व आडते यांच्यात समन्वय बैठक होऊन यातून मार्ग काढणे अपेक्षित असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. शिवाय बाजार समितीचे मार्गदर्शक असलेले आ. बाबासाहेब पाटील यांना यात तोडगा काढता आला नाही. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सहाय्यक निबंधक उपजिल्हा निबंधक व पनन महासंघाकडे मार्गदर्शन मागून (Ahmedpur Bazaar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले हात झटकले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांशी बाजार समितीला काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. यातच सणासुदीच्या दिवसात शेतमाल विकण्याचा मार्ग बंद करुन शेतकऱ्यांची मुस्कटदाबी चालविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान उद्या कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.
बाजार समितीवरच कारवाई अपेक्षित!
बाजार समितीने तोडगा काढणे आवश्यक होते. तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या बाजार समिती सभापती व संचालक मंडळावर पणन महासंघ व जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनीही लक्ष न घातल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.