नगर पंचायत मुख्याधिकार्याचा अजब प्रताप
बाभुळगाव (Babhulgaon Nagar Panchayat) : माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये चक्क कोरे कागद अर्जदाराला दिले. हा अजब गजब प्रकार बाभूळगाव नगर पंचायतमध्ये घडला. मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या या प्रतापामुळे हैराण झालेल्या अर्जदार तथा माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे यांनी या संबंधीची तक्रार थेट राज्य माहिती आयोग व वरीष्ठ कार्यालयात केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, नगर पंचायत बाभूळगावची स्थापना ८ एप्रिल २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली. त्या कालावधीपासून अनेक मुख्याधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी यांना पदाचा पदभार दिलेला आहे. त्या अनुषंगाने या कालावधीतील शासकीय हलचल रजिस्टरच्या सत्यप्रती मिळणेबाबत माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे यांनी अर्ज केला होता. विद्यमान मुख्याधिकारी डॉ.सोटे यांचे कार्यकाळातील शासकीय हलचल रजिस्टरच्या सत्यप्रती मिळण्यासाठी त्यात उल्लेख करण्यात आला होता, परंतु माहिती विहित मुदतीत न मिळाल्याने त्यांनी दि. १८ जून २०२५ रोजी प्रथम अपिल दाखल केली होती.
त्या नुसार येथिल मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांचे (Babhulgaon Nagar Panchayat) कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहुन ७ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान त्यांनी शासकीय हलचल रजिस्टर रविंद्र काळे यांना दाखविले, ज्यातील पहिल्या पानावर रजिस्टरमधील पानांची संख्या लिहीली होती व ते पान वगळता इतर सर्व पाने कोरी होती. याबाबत त्यांना विचारणा केली असता नगर पंचायत बाभूळगाव येथील मुख्याधिकारी यांचे शासकीय हलचल रजिस्टर असेच आहे, असे सांगून त्यांनी त्या रजिस्टर मधील क्र. १ ते ७५ अश्या सर्व ७५ पानांच्या छायांकीत प्रती काढून त्यावर सत्यप्रत शिक्का व नगर पंचायतचा गोल शिक्का मारून रविंद्र काळे यांना दिल्या.
या प्रकारामुळे रविंद्र काळे हैराण झाले असून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कोरी माहिती किंवा कोरे कागद देता येतात काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी रवींद्र काळे यांनाr लोकायुक्त, राज्य माहिती आयोग, मुख्य माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे तक्रार दाखल केली. तसेच अश्या बेजबाबदार मुख्याधिकारी यांचे कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचेवर या प्रकरणी कलम २०(१), २०(२) अन्वये शिस्तभंगाच्या कार्यवाहीची मागणी तक्रारीतून केली आहे.




