नाशिक (Ajit Pawar) : आदिवासी बांधवांनो घाबरु नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी केवे. सुरगाणा येथे आयोजित ९१९ कोटी ४० लाख रुपयांचे विविध विकास कामांच्या भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar), माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, राजेंद्र उफाडे, सोनालीराजे पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, ऋषी पवारआदी उपस्थित होते. यावेळी पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मी सत्तेसाठी हपापलेला नाही. कधी सरकार मध्ये तर कधी विरोध पक्षनेता म्हणून काम केले आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणारा आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघात बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. मी सामान्य वाडी वस्तीतून आलेला गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे. मी शब्दाचा पक्का आहे. अजितदादाचा वादा एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे.
आमदार हा विकासासाठी असला पाहिजे. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत. राज्य दिवाळखोरीत काढले असा आरोप होतोय पण व्यवहार मलाही कळतो. लाडकी बहिण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. हे कदापि होणार नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे गैरसमज व फसवेगिरी करणार नाही. सर्व सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही. सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष आहे. गरीबाला मदत करुन विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. लाडकी बहिण योजना हि अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून मोलमजुरी, धुणे भांडी करणा-या, कचरा गोळा करून उदरनिर्वाह करण्या-या महिला ताठ मानेने त्यांना समाजात जगता आले पाहिजे यासाठी आहे. कोणत्याही जाती धर्माची अट या योजनेत नाही. यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, अतिदुर्गम आकांक्षित तालुक्यात दर्जेदार पोषण आहार पुरवठा केला जातो.भगिनींना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायच्या आहेत. पर्यटनस्थळ निर्माण केली जाणार असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. लाडकी बहिण योजनेत अधिवास प्रमाण पत्राची अट रद्द केली आहे. नरहरी झिरवाळ यांनी चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमिनीचा प्रश्न निकाली काढावा, पाणी अडविण्यासाठी बंधारे, पाझर तलाव, धरणे याबाबत असलेल्या जाचक अटी वनविभागाने शिथिल कराव्यात, पेसा भागातील भरती करावी या मागण्या सादर केल्या.
आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षात तालुक्याचा विकास का झाला नाही याचा विचार करायला हवा. सुरगाणा हा आकांक्षित तालुका निवड होणे हा कलंक आहे. तो विकासाच्या माध्यमातून पुसून काढायचा आहे. हतगड येथील सभेत अजितदादा उपमुख्यमंत्री होतील हि जनतेची आशा खरी ठरली आहे. पुनद धरणाला अर्जुन सागर हे माझ्या वडिलांचे दादासाहेबांचे नाव दिले हे दादांनी दिले आहे.मधील काळात विकास खुंटला होता.ती पोकळी भरून काढायची आहे. सुरगाणा, बा-हे पोलीस ठाणे इमारत बांधकाम, सुरगाणा नगरपंचायतीत कामे मंजूर केली आहेत. भविष्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. श्रीभुवन धरणाला बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून काम सुरु केले आहे. दुमी औरंबा धरणाला लवकरच मंजूरी दिली जाणार आहे.यावेळी तालुक्यातून साडेचार ते पाच हजार कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध विभागाचे अधिकारी यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार,तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे उपस्थित होते.
सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) भारावून गेले. आदिवासी नृत्यविष्कार कला हि संस्कृतीचा अम्यूल्य ठेवा आहे. ती संस्कृती पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी जपली पाहिजे. पावसाची तमा न बाळगता महिलांची विशेष उल्लेखनीय उपस्थिती.सुरगाणा तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेली खाण आहे. हतगड किल्ला, भिवतास धबधबा, पिंपळसोंड तातापाणी ( गरम पाण्याचे झरे) या ठिकाणी विकास कामे सुरु केली आहेत. हतगड येथे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करीता कलादालन करीता शंभर कोटी रुपये मंजूर केले जाणार. वन पर्यटन निर्माण केले जाणार. औद्योगिक वसाहती करीता जागा उपलब्ध नसल्याने वेगळा मार्ग काढला जाईल.