उदगीर(Latur) :- उदगीर शहरात मोठ्या थाटामाटात, सरकारी पैशाची उधळपट्टी करून लाडकी बहीण योजनेचा उहापोह करण्यात आला. मात्र, उदगीर विधानसभा मतदारसंघात गुलाबी रंगाची अलर्जी दिसून आल्यानेच, अजित पवारांनी कार्यक्रमाला दांडी मारली असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Nationalist Congress) मंत्र्याच्या कार्यक्रमाला दादांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी असून यामागे ‘नाराज’कारण असल्याचे बोलले जात आहे.
भाऊच्या कार्यक्रमाला दादाची दांडी!
आगामी काळात याचे पडसाद राजकीय पटलावर उमटतील, असेही चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. अजितदादांना त्यांच्या आजारीपणामुळे विश्रांतीची गरज असेलही, पण मतदारसंघात मात्र नाराजीचीच चर्चा जोरात असून भविष्यात समीकरण जुळेल का.? यावर चर्चेचा बाजार गरम आहे. मागच्या आठवड्यात दादांची गुलाबी यात्रा शेजारच्या मतदारसंघातून गेली होती. मात्र, तेंव्हाही दादांनी उदगीरकडे कानाडोळा केला होता, लातूर जिल्ह्यात उदगीर आणि अहमदपूर हे दोनच मतदारसंघ घड्याळाच्या वाट्याला असताना, दादांनी आपल्या भाषणात उदगीरचा साधा नामोल्लेखही केला नव्हता.! त्यामुळे, काहीतरी गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, मुख्यमंत्री (Chief Minister) व उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रपतींच्या समोर उदगीर जिल्हा निर्माण करण्याबाबत काहीतरी ठोस घोषणा केली जाईल असे वातावरण स्थानिक नेत्यांनी तयार केले होते. मात्र, येथील लोकप्रतिनिधीला पुन्हा एकदा बळ द्या, मग तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील अशी गुगली स्वतः मुखमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फेकली असल्याने, पुन्हा एकदा उदगीर जिल्हा निर्मितीला रेड सिग्नल मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
लाडक्या बहिणीचे ‘बेहाल’..
कार्यक्रमाला बोलावण्यासाठी मुराळी आले अन् बहिणी गेल्याही.! मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर त्याच लाडक्या बहिणींना कुणी विचारायला तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शेकडो लाडक्या बहिणींना कार्यक्रम स्थळापासून ते तोंडारपाटी पर्यंत आपले वाहन पकडण्यासाठी चालत जावे लागले. त्यामुळे महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फक्त गर्दी दाखविण्यासाठी शासकीय यंत्रणेने महिलांचा उपयोग करून घेतला होता. कार्यक्रम झाल्यानंतर बिचाऱ्या महिलांना आठ दहा किलोमीटर पायपीट करावी लागली यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय.?
उदगीर जिल्हा निर्मितीचे पुन्हा, गाजर..!
काही वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर जिल्हा करणार असल्याचे वचन दिले होते. पण, नेहमीप्रमाणे त्यांनी दिलेल्या वाचनाचा त्यांना विसर पडला असल्याचे यावेळीही दिसून आले. भोळ्याभाबड्या जनतेला मागच्या अनेक वर्षापासून जिल्हा निर्मितीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांनी, पुन्हा एकदा उदगीरकरांच्या हातात गाजरच दिले असल्याची भावना येथील जनतेची आहे. त्यात, येथील लोकप्रतिनिधींना परत एकदा निवडून द्या, मग जिल्हा निर्मिती व इतर मागण्यांचे बघू असे एकप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले असल्याने, उदगीर जिल्हा निर्मिती प्रचाराचा मुद्दा बनणार असल्याचे चित्र आहे. नेहमीच्या आश्वासनांचा येथील जनतेला वीट आला असून उदगीरकरांच्या आशा यंदातरी मावळल्या असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.