अखिल भारतीय छावा संघटनेच्या शिष्टमंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी
लातूर (Akhil Bharatiy Chhava Sangathan) : लातूर जिल्ह्यात या महिनाभरात सतत अतिवृष्टी होत असून शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकरी उघड्यावर पडला असून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत सरसकट द्यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी (Akhil Bharatiy Chhava Sangathan) अखिल भारतीय छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली.
लातूर जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावोगाव हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच शिल्लक राहिले नाही. या शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत असून या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करावी, क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ तात्काळ स्थापन करावे, अशा मागण्याही यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.
या मागण्यासाठी संघटनेच्या (Akhil Bharatiy Chhava Sangathan) वतीने लातूर येथे परवा लातूर-औसा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याची आपण तात्काळ दखल घ्यावी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय अत्यंत तात्काळ मांडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, अन्यथा या मागण्यासाठी संघटना तमाम शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरेल, असा इशारा या शिष्टमंडळाने दिला.
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बिडवे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय राठोड, शहराध्यक्ष बालाजी निकम, राजू नरके, कामगार आघाडीचे रघुनाथ पवार, सागर बचाटे सिद्धार्थ मांदळे, राहुल मोरे, ज्ञानेश्वर शेटे व कार्यकर्ते सहभागी होते.